‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…


गांधी आणि इंग्रजी सिनेमा

रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी १९८२ साली गांधींच्या जीवनावर सिनेमा काढला. त्याला एकूण आठ ऑस्कर मिळाले. हा सिनेमा जगभर गाजला. हॉलिवुड आणि परकीय भाषेत पुढे गांधींचा विचार सतत दिसला. २००७ साली ‘द ग्रेट डिबेटर्स’ हा डेंझिल वॉशिंग्टन यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आला. त्याचा काळ १९३५चा आहे. याची कथा सत्यघटनेवर आधारलेली आहे. अमेरिकेतील टेक्ससमध्ये वायली या नावाचे निग्रो मुलांचे एक छोटे महाविद्यालय असते. तिथं एक नवीन शिक्षक येतात आणि विद्यार्थ्यांची ‘डिबेट टीम’ तयार करतात. ही टीम स्पर्धेत उतरते, एकेक टप्पा पार करत अंतिम सामन्यात पोचते. अमेरिकेत निग्रो विद्यार्थ्यांची पहिलीच टीम अंतिम सामन्यात पोचते. तिथे सामना होतो हार्वर्ड विद्यापीठाच्या (गोऱ्या) विद्यार्थ्यांसोबत. अंतिम डिबेट सुरू होते. ही डिबेट ‘हिंसा विरुद्ध अहिंसा, सहिष्णुता विरुद्ध असहिष्णुता, कायदा विरुद्ध सविनय कायदेभंग’ अशी बनते. निग्रो विद्यार्थी अहिंसा, असहकार, सहिष्णुतेच्या बाजूने असतात; तर गोरे विद्यार्थी कायदा, सुव्यवस्था आणि कायद्याचा अंमल राखण्यासाठी हिंसा गरजेची असते, म्हणजेच अनागोंदी होऊ नये, सुव्यवस्था टिकून रहावी म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हिंसा करणे गरजेचे असते, अशा आशयाचे मत मांडतात. अहिंसेची, असहकाराची बाजू मांडत असताना निग्रो विद्यार्थी गांधीजींचे असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंगाचे दाखले देतात. या संपूर्ण सिनेमावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे.

याच वर्षी नेटफलिक्सवर आलेल्या ‘मनी हेस्ट’ या स्पॅनिश मालिकेतही गांधींचा उल्लेख येतो. थोडक्यात गांधींचा प्रभाव जगातील केवळ राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रांवर नसून जागतिक सिनेमामध्येही आहे, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही.

गांधी आणि हिंदी सिनेमा

१९९६मध्ये श्याम बेनेगल यांनी ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ बनवला. २००० नंतर भारतीय सिनेमांमध्ये गांधी जास्त प्रमाणात दिसायला सुरू झाले. ‘मैंने गांधी को नहीं मारा’ (२००५), ‘गांधी माय फादर’ (२००७)… दरम्यान २००६ साली ‘लगे रहो मुन्ना भाई’ हा सिनेमा राजकुमार हिराणी यांनी प्रदर्शित केला. तो जोरदार हिट झाला. गांधींच्या विचारांची ती नवी मांडणी लोकांना खूप भावून गेली. अ‍ॅटनबरोंच्या किंवा इतर गांधींवरील सिनेमात त्यांना संतरूपात जास्त दाखवतात, पण ‘लगे रहो…’मध्ये ‘गांधीगिरी’ समोर आली आणि तिने प्रेक्षकांना चकित करून टाकले. गांधी सामान्य लोकांना कळेल इतक्या साध्या सरळ पद्धतीने मांडण्यात आले. पुढे शशी थरूर यांनी युनायटेड नेशन्स, न्यूयॉर्कमध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’चे स्क्रिनिंग घडवून आणले. यूएनमध्ये दाखवला गेलेला तो पहिला भारतीय सिनेमा ठरला.

सिनेमा आणि प्रोपगंडा

२०१४च्या सत्तांतरानंतर मात्र चित्रपटसृष्टीमध्ये मोठे बदल झाले. गोडसेवादी पूर्ण ताकदीने पुढे येऊ लागले. ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘इंदू सरकार’, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ असे काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांची कुचेष्टा करणारे सिनेमे येऊ लागले. सिनेमांची जागा प्रोपगंडाने घेतली. गांधीविरोधी, बहुजनविरोधी आणि अभिजनवादी वृत्ती पुढे आली. सिनेमा बाजूला सारून अभिजनवादी प्रोपगंडा चालवण्याची ही मूळची मराठी सिनेसृष्टीच्या वृत्तीची लागण हिंदी सिनेसृष्टीलादेखील झाली. मराठी सिनेसृष्टीने आपली पूर्ण हयात ग्रामीण भागाची कुचेष्टा, गावंढळ भाषेचे हसू, गावचा प्रमुख कसा क्रूर, बहुजन समाजातील लोक कसे भ्रष्ट आणि उपद्रवी दाखवण्यात घालवली.

याचे एक उदाहरण सांगायचे झाले तर मोहन जोशी, शरद पोंक्षे आणि सीमा तळवलकर यांचा ‘छडी लागे छम छम’ हा सिनेमा. तो २००५ साली आला. हा सिनेमा माध्यमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांवर आहे. यात नेहमी गुटखा खाऊन, उपद्रव करणारे शिक्षक असतात ‘कांबळे मास्तर’, मास्तरांच्या चहाड्या करणारा शिपाई असतो ‘संभाजी’ आणि विद्यार्थ्यांत शिस्त निर्माण व्हावी, यासाठी मनाने झटणारे शिक्षक असतात ‘देव’ सर अर्थात शरद पोंक्षे.

एकीकडे हे घडत असताना दुसऱ्या बाजूला तमिळ- तेलुगू- मल्ल्याळम सिनेमे पाठीमागून येऊन हिंदीच्याही पुढे चालले आहेत. अशा काळात मराठी सिनेमा स्पर्धेतही नाही. हे घडण्यापाठीमागील कारण म्हणजे दाक्षिणात्य सिनेमे मराठीसारखे कुचकामी उद्योग करत बसले नाहीत. आज दाक्षिणात्य सिनेसृष्टी गांधी-आंबेडकर मांडते. आणि मराठी? ज्या पद्धतीने मराठीमध्ये सिनेमा प्रोपगंडा निर्माण करण्यासाठी वापरला गेला आहे, त्याची फळे आजची मराठी सिनेसृष्टी भोगत आहे, यात काही शंका नाही.

मराठी सिनेमांचे छद्मी उद्योग आजही सुरूच आहेत आणि ते सिनेक्षेत्राची हानी करत आहेत. पण काहीही  झाले तरी चालेल, मात्र आपले सांस्कृतिक अंजेंडे कुठे मागे पडता काम नयेत, एवढाच मराठी सिनेसृष्टील्या अनेकांचा उद्देश दिसतो.

म्हणूनच २ ऑक्टोबरचे औचित्य साधून महेश मांजरेकर ‘गोडसे’ या नव्या सिनेमाची घोषणा करतात.

एरवीही महाराष्ट्रात नथुराम गोडसे कसा श्रेष्ठ आणि योग्य याची ‘नाटके’ केली जातात. हे निंदनीय असले तरी आपण अभिव्यक्तीच्या नावाखाली स्वीकारले आहे. स्वीकारलेच पाहिजे. त्यांची भूमिका मांडणे त्यांचे स्वातंत्र्य आहे, हे आपण जाणले आहे. पण अशा सांस्कृतिक उद्योगांमुळे मराठी सिनेमा आणि नाटक यांची अपरिमित हानी झाली आहे. पण हेही तितकेच खरे की, सिनेमा व नाटक यांच्या माध्यमांमधून स्वातंत्र्याच्या नावाखाली कितीही प्रोपगंडे चालवले तरी त्याने सत्य बदलणार नाही, बदलत नाही. अशा कारस्थानांमुळे आजवर मराठी सिनेमांची आणि नाटकांची झालेली दुर्दशा भरून निघणार नाही.

त्यामुळे मांजरेकरांनी ‘गोडसे’वर चित्रपट नक्की बनवावा. एका माथेफिरूचा गौरव करावा. गांधींना हवे तसे चित्रित करावे. एका नंग्या फकिराला अजून कोण किती नंगे करणार! जगात गांधींना, त्यांच्या विचाराला जो काही मानसन्मान आहे, तो असा कारस्थानांनी कमी होणार नाही. उलट ‘गोडसेवादी’ सिनेसृष्टी जगासमोर उघडी पडणार आणि एखाद्या डबक्याएवढी सीमित राहणार, यात शंका नाही. जेव्हा मराठी सिनेसृष्टी आपला अभिजनवादी दृष्टिकोन सोडून गांधींच्या विचारांना घेऊन पुढे येईल, तेव्हाच तिचे पुनरुत्थान होईल. त्यामुळे येत्या काळात गांधी हाताळण्याइतपत मराठी सिनेसृष्टी सक्षम होईल, हीच यानिमित्तानं सदिच्छा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘कुरुमावतार’

नोमॅडलँड